चौधरवाडी-गारपिरवाडीत शिवसेनेचा एल्गार; चार नव्या शाखांच्या उद्घाटनाने शक्तीप्रदर्शन.
फलटण (प्रतिनिधी): "शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या नावाखाली फलटण तालुक्यात सध्या विरोधकांकडून केवळ दडपशाही आणि चमचेगिरीचे राजकारण सुरू आहे. सामान्य कार्यकर्त्यांवर दबाव आणून प्रवेश करून घेण्याचे हे घाणेरडे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही," अशा शब्दांत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला.
चौधरवाडी आणि गारपिरवाडी येथे चार शिवसेना शाखांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सध्या सुरू असलेल्या 'जनता दरबार' संकल्पनेवर प्रहार करताना संजीवराजे म्हणाले की, "फलटणमध्ये खरा आणि ओरिजनल जनता दरबार हा फक्त राजघराण्याचाच आहे. इतर जे काही उपक्रम राबवले जात आहेत, तो केवळ दिखावा आहे." एखाद्याला अडचणीत आणायचे, त्याच्यावर दबाव टाकायचा आणि पक्षप्रवेश करून घ्यायचा, हे फलटणच्या संस्कृतीला धरून नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
विरोधकांच्या दौऱ्यावर टीका करताना त्यांनी विकासाचा मुद्दा उपस्थित केला. "विरोधकांनी या भागात विकासाचे १०० रुपयांचे तरी काम दाखवावे," असे आव्हान देत त्यांनी गारपिरवाडीत गेल्या अडीच वर्षांत सुमारे १ कोटी रुपयांच्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. युवकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता विकासाच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी शासकीय दौऱ्यावरून प्रशासनाला आणि विरोधकांना धारेवर धरले. "शासन आपल्या दारी हा उपक्रम महायुती सरकारचा आहे. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री (उपमुख्यमंत्री उल्लेखित) असूनही या दौऱ्याच्या फलकांवर त्यांचा फोटो का लावला जात नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा शासकीय दौरा नसून केवळ राजकीय स्टंट असल्याची टीका त्यांनी केली.
येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चौधरवाडी व गारपिरवाडीतून शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास संजीवराजेंनी व्यक्त केला. तालुक्यात पूर्णपणे शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, उत्तमदादा चौधरी, अशोक आप्पा शिर्के, विराज खराडे, विनोद शिंदे, यशपाल भोसले, गणेश तांबे, हेमंत भोसले, लालासाहेब दहीगुडे, भानुदास सस्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.