'देर आये दुरुस्त आये' की 'वरातीमागून घोडे'? तात्यांच्या खुलाशाने साखरेपेक्षाही कडू वास्तवाचा उलगडा!
फलटण (प्रतिनिधी):राजकारणात 'येरे माझ्या मागल्या' म्हणत शब्दांचे फुलोरे रचणे सोपे असते, मात्र वस्तुस्थिती लपवणे कठीण असते. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव (तात्या) साळुंखे पाटील यांनी डी.के. पवार यांच्या संदर्भात जो खुलासा केला आहे, तो म्हणजे 'चोरी वर शिरजोरी' असल्याचा प्रकार असल्याची चर्चा आता फलटणच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पवारांचे 'राजकीय अतिक्रमण' झाले की वर्षानुवर्षे ज्यांनी निष्ठा वाहिली त्यांना डावलल्यामुळे त्यांनी सन्मानाचा मार्ग धरला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तात्या साळुंखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "इथून पुढे डी.के. अण्णांचा सन्मान खासदार, आमदार आणि आमच्याकडून केला जाईल, त्यांना डावलले जाणार नाही." तात्यांच्या याच वाक्यात सगळं काही दडलंय! याचाच अर्थ असा की, आजवर डी.के. पवारांना सन्मान मिळत नव्हता आणि त्यांना जाणीवपूर्वक डावलले जात होते. ज्या माणसाने आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांना आता 'सन्मान देऊ' असे आश्वासन देण्याची वेळ तात्यांवर का आली? हा निव्वळ पवारांना भीती दाखवून किंवा दबावाखाली रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
तात्यांनी कितीही चहापानाचा आणि 'अचानक भेटीचा' बनाव रचला असला, तरी गेल्या आठवड्याभरापासून डी.के. पवार आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात बंद दाराआड खलबतं सुरू आहेत, हे खुद्द साखरवाडीच्या जनतेला ठाऊक आहे. सत्य लपवण्यासाठी तात्या एखाद्या लहान मुलाला गोष्ट सांगावी तसे स्पष्टीकरण देत आहेत, परंतु जनता आता दुधखुळी राहिलेली नाही.
एकीकडे तात्या युतीचे गोडवे गात असताना, दुसरीकडे ग्राउंड रियालिटी वेगळीच आहे. खासदार गटात गेलेले अनेक जुने जाणते कार्यकर्ते आणि नेते आता पुन्हा स्वगृही म्हणजेच 'राजे गटात' परतताना दिसत आहेत. डी.के. पवारांनी घेतलेली भूमिका ही याच असंतोषाचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
"सन्मान नव्हता म्हणूनच तर 'निर्णय' झाला असेल!"
राजकारणात कोणाच्याही घरी चहा प्यायला जाणे हे अतिक्रमण नसते, तर तो संवाद असतो. पण जेव्हा स्वतःच्या घरातला माणूस बाहेर पडू लागतो, तेव्हाच अशा 'अतिक्रमणाच्या' कंड्या पिकवल्या जातात. तात्यांनी आता तरी वास्तव स्वीकारावे की, केवळ आश्वासनांवर आता जुन्या जाणत्या नेत्यांना थोपवून धरता येणार नाही.