फलटण (प्रतिनिधी):आपल्या शहराप्रती असलेली सामाजिक जबाबदारी ओळखून, फलटणला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी’ ने कंबर कसली आहे. या वर्षातील स्वच्छतेच्या महासंकल्पाचा दुसरा रविवार आज दि. २५ जानेवारी २०२६ रोजी शहरातील पिरेमिड चौक ते भडकमकर नगर परिसरात यशस्वीरीत्या पार पडला. अवघ्या दोन तासांत स्वयंसेवकांनी ५० किलोहून अधिक प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा नवा आदर्श मांडला आहे.
नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज सकाळी ०६:३० वाजता थंडीची पर्वा न करता संस्थेचे सदस्य आणि स्वयंसेवक पिरेमिड चौकात एकवटले. सकाळी ०८:३० पर्यंत चाललेल्या या मोहिमेत रस्त्यालगत, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा वेचण्यात आला.
मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:
या मोहिमेदरम्यान काही नागरिक उघड्यावर कचरा टाकत असताना निदर्शनास आले. संस्थेच्या सदस्यांनी त्यांना वेळीच रोखून, पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना या सवयीपासून परावृत्त केले. नागरिकांनीही आपली चूक मान्य करत मोहिमेचे कौतुक केले, हेच या मोहिमेचे मोठे यश मानले जात आहे.
"ही केवळ एक दिवसाची मोहीम नाही, तर ही एक चळवळ आहे. या वर्षातील ५० रविवार आम्ही फलटणच्या विविध भागात ही मोहीम सातत्याने राबवणार आहोत. आज आपण दिलेला हा एक तास उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ आणि सुरक्षित भविष्य घडवेल," असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
भडकमकर नगर परिसरातील अनेक जागरूक नागरिकांनी संस्थेच्या या कार्याचे स्वागत केले असून, पुढील रविवारी मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीत सहभागी होऊन आपले शहर प्लास्टिकमुक्त करावे, असे आवाहन 'नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी'ने केले आहे.