बारामती: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याने बारामती नगर परिषदेत आज मोठा राडा झाला. या प्रकारामुळे संतापलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या कारभाराचा तीव्र निषेध करत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
२६ जानेवारी रोजी बारामती नगर परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, मात्र संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आली नव्हती. ही बाब समोर येताच आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली.
"ज्या संविधानामुळे आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, त्या संविधानाच्या निर्मात्यालाच अधिकृत कार्यक्रमात डावलले जाणे ही अत्यंत दुर्दैवी आणि अपमानास्पद बाब आहे," असा आरोप आंदोलकांनी केला. आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने कार्यकर्ते नगर परिषदेसमोर जमले होते. हातात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन "बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आंदोलन सुरू असतानाच नगराध्यक्ष सचिन सातव कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी समोर आले. यावेळी संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांनी नगर परिषद प्रशासन आणि मुख्याधिकाऱ्यांनी या गंभीर चुकीबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी लावून धरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.