फलटण (प्रतिनिधी):
अलगुडेवाडी येथील प्राथमिक व माध्यमिक पाच पांडव आश्रमशाळेत देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष श्री. श्रीपाल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेवराव नाळे होते.
प्रभात फेरीने वातावरणात चैतन्य
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी काढण्यात आलेल्या भव्य प्रभात फेरीने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेली घोषणाबाजी आणि शिस्तीमुळे परिसरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी कवायती, लेझीम नृत्य आणि झांज पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून:
सौ. सविता दोशी (MaRC योगा व मेडिटेशन कमिटी कन्व्हेनर)
मा. भगत साहेब (सचिव, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग)
मा. भराडे सर (अध्यक्ष, फलटण तालुका मानवाधिकार आयोग)
जैन सोशल ग्रुप पदाधिकारी: नीना कोठारी (सचिव), राजेश शहा (खजिनदार), राजेंद्र कोठारी (माजी अध्यक्ष), डॉ. मिलिंद दोशी (संचालक), सौ. मनिषा घडिया, सौ. अर्पणा जैन (माजी अध्यक्षा, संगिनी फोरम) यांची विशेष उपस्थिती होती.
बक्षिसांची लयलूट आणि मदतीचा हात
प्रमुख पाहुणे श्रीपाल जैन यांनी आपल्या मनोगतात आश्रमशाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी इयत्ता १० वी मधील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच शाळेला भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जैन सोशल ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना २०० बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
मानवाधिकार आयोगाचे भगत साहेब आणि भराडे सर यांनीही शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.