सोनवडी खुर्द (प्रतिनिधी):
देशसेवा करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते, हे दुधेबावी ता. फलटण येथील माजी सैनिक दयानंद सोनवलकर यांनी सिद्ध केले आहे. भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत घवघवीत यश संपादन करत 'पोलीस शिपाई' पदावर झेप घेतली आहे. या यशाबद्दल सोनवडी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
दुहेरी देशसेवेची संधी
श्री. सोनवलकर हे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलातील आपली गौरवशाली सेवा पूर्ण करून निवृत्त झाले होते. मात्र, निवृत्तीनंतर शांत न बसता त्यांनी पुन्हा एकदा खाकी वर्दी परिधान करून समाजसेवेचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरतीमध्ये त्यांनी 'माजी सैनिक' प्रवर्गातून आपली निवड निश्चित केली. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोहळा
यानिमित्त आयोजित सत्कार समारंभाला परिसरातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवा नेते सचिन सूर्यवंशी यांनी सोनवलकर यांच्या जिद्दीचा आदर्श तरुण पिढीने घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवर:
सत्कार प्रसंगी पांडुरंग सोनवलकर, परशुराम सोनवलकर, सचिन चव्हाण, राहुल पवार, रामचंद्र कर्णे, शरद सूर्यवंशी, धनंजय सोनवलकर, संभाजी कोकरे, अक्षय सोनवलकर, नामदेव सोनवलकर, पृथ्वीराज कोकरे, राजेंद्र सोनवलकर, मनीषा सोनवलकर आणि सोनवडी खुर्द गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.