फलटण: प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या जागतिक दर्जाच्या संचलनात यंदा फलटणच्या मुधोजी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सारथ्य करणार आहेत. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित 'गणेशोत्सव' चित्ररथात कलाविष्कार विभागातील आदित्या वाघमारे आणि आदित्य रणदिवे हे दोन गुणी कलाकार लेझीम लोकनृत्य सादर करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन देशाला घडवणार आहेत.
गणेशोत्सव: सांस्कृतिक वैभवासोबतच आर्थिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या चित्ररथात गणेशोत्सवातील केवळ धार्मिक स्वरूप न दाखवता, त्यातून निर्माण होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकार आणि वाद्यवृंद यांना मिळणारा शाश्वत रोजगार व त्यातून विणली गेलेली भक्कम 'आर्थिक साखळी' केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण चित्ररथात सहभागी होण्याची संधी मुधोजीच्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम म्हणाले की, "अश्या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत, ही फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी महाविद्यालयासाठी अत्यंत कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे."
मार्गदर्शन आणि शुभेच्छांचा वर्षाव या विद्यार्थ्यांच्या यशात सांस्कृतिक विभागाचे (Cultural Club) प्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर आणि नृत्य दिग्दर्शक राजेंद्र संकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे:
अध्यक्ष: मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
चेअरमन: श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
सचिव: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
प्रशासन अधिकारी: प्राचार्य अरविंद निकम
यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.