'बाहेरच्यांनी' फलटणच्या स्वाभिमानाला नख लावू नये; जयकुमार गोरेंच्या आरोपांना राजे गटाचे सडेतोड उत्तर!
फलटण (प्रतिनिधी):"ज्यांनी कायम विभाजनाचे आणि दहशतीचे राजकारण केले, त्यांनी फलटणच्या ३५ वर्षांच्या सुसंस्कृत वारशाला 'पारतंत्र्य' म्हणणे हा या मातीतील जनतेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. सत्तेच्या बळावर निधीची भाषा करून लोकशाही विकत घेता येत नाही," अशा कडक शब्दांत राजे गटाच्या समर्थकांनी नामदार जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुनावले आहे.
पाडेगाव येथील सभेत 'वाड्यावर मुजरा' आणि 'पॅकेज' या मुद्द्यावरून केलेल्या विधानांचा राजे गटाने खरपूस समाचार घेतला असून, या टीकेला 'वैचारिक दिवाळखोरी' म्हटले आहे.
राजे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, "राजवाडा हा फलटणच्या अस्मितेचे केंद्र आहे. तेथे मुजरा करायला नाही, तर हक्काने कामे घेऊन लोक येतात. ज्यांना लोकशाहीत 'जनतेचे प्रेम' आणि 'गुलामगिरी' यातला फरक कळत नाही, त्यांनी फलटणच्या राजकारणावर भाष्य करू नये. ३०-३५ वर्षे फलटण शांत होते, कारण येथे विकास आणि विश्वासाचे राजकारण होते. बाहेरच्या मंडळींनी येथे येऊन विखारी भाषा पेरून शांतता भंग करू नये."
जयकुमार गोरे यांनी दिलेल्या १० पट निधीच्या आश्वासनावर बोलताना कार्यकर्ते म्हणाले, "डीपीडीसीचा निधी हा काय कोणाच्या घरचा पैसा नाही, तो जनतेच्या हक्काचा टॅक्स आहे. निधी अडवणे आणि नंतर उपकार केल्यासारखे जाहीर करणे, हा लोकशाहीचा सर्वात मोठा द्रोह आहे. तरडगाव गटाच्या ज्या विकासाच्या गोष्टी तुम्ही करता, त्याच तरडगावने राजेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला दिशा दिली आहे, हे विसरू नका."
"विरोधकांचा सुपडा साफ करण्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी एकदा जमिनीवर येऊन जनतेचा कल पाहावा. केवळ प्रशासनाला हाताशी धरून गावोगावी फिरणे म्हणजे विकास नसतो. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उभ्या केलेल्या सहकार आणि पाणी प्रकल्पांमुळे आज फलटण सुजलाम सुफलाम आहे. हे प्रकल्प कोणा एका मंत्र्याच्या 'पॅकेज'मुळे उभे राहिलेले नाहीत."
"आज फलटण तालुक्याला कोणाकडूनही 'स्वातंत्र्य' मिळवून देण्याची गरज नाही. उलट अशा प्रवृत्तींपासून फलटणला वाचवण्याची वेळ आली आहे, ज्यांना फक्त सत्तेची भाषा समजते. निवडणुकीच्या मैदानात जनताच या टिकेला मतपेटीतून उत्तर देईल," असा इशाराही यावेळी देण्यात आला.