फलटण: प्रतिनिधी पर्यावरणाचे रक्षण आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी 'स्वच्छता हेच संरक्षण' मानत फलटणमधील नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीने एका स्तुत्य उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे. रविवार, १८ जानेवारी रोजी विमानतळ परिसरात राबवलेल्या मोहिमेत अवघ्या दोन तासांत तब्बल २५ ते ३० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.
आज सकाळी ६:३० ते ८:३० या वेळेत संस्थेच्या सदस्यांनी विमानतळ परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी परिसरात विखुरलेला प्लास्टिक कचरा, पिशव्या आणि बाटल्या गोळा करण्यात आल्या. संकलित केलेला हा कचरा पुढील योग्य व्यवस्थापनासाठी फलटण नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
केवळ एक दिवस मोहीम न राबवता, निसर्गाप्रती आपले देणे लागते या भावनेतून संस्थेने एक मोठा निश्चय केला आहे. या वर्षातील ५० रविवार दररोज सकाळी दोन तास (६:३० ते ८:३०) फलटण शहर आणि परिसरातील विविध भागांत प्लास्टिक कचरा संकलन मोहीम नित्यनियमाने राबवली जाणार आहे.
"प्लास्टिकमुळे केवळ शहर अस्वच्छ होत नाही, तर त्याचे घातक परिणाम वन्यजीव, पक्षी आणि एकूणच पर्यावरणावर होत आहेत. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही हा निर्धार केला आहे."
— नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण.
उघड्यावर पडलेले प्लास्टिक अनेकदा वन्यजीवांच्या अन्नात जाते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. तसेच जमिनीचा कसही कमी होतो. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, नेचर सोसायटीने नागरिकांनाही प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.