फलटण ; चीनमधील स्पर्धेत फलटणच्या दोन हॉकीपटूंची चमकदार कामगिरी, 'चक दे इंडिया' म्हणत भारतीय संघाला उपविजेतेपद! फलटण- चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण हॉकी स्पर्धेत फलटणच्या दोन प्रतिभावान महिला हॉकीपटूंनी आपल्या खेळाची छाप पाडली आहे. वैष्णवी फाळके आणि ऋतुजा पिसाळ यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय यश फलटण तालुक्यातील कोळकी गावातील ऋतुजा पिसाळ आणि आसू गावातील वैष्णवी फाळके यांनी ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास यशस्वी करून दाखवला आहे.
ऋतुजा पिसाळ - एका सामान्य कुटुंबातून आलेल्या ऋतुजाचे वडील गॅरेजमध्ये मिस्त्रीकाम करतात. तिने तिच्या उत्कृष्ट 'ड्रिबलिंग' कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. तिने यापूर्वी २०२३ मध्ये महिला ज्युनियर आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
वैष्णवी फाळके - आसू गावातील शेतकरी कुटुंबातील वैष्णवी एक उत्कृष्ट 'डिफेंडर' म्हणून ओळखली जाते. २०१७ मध्ये तिने रमानाथपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवून केरळमधील राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत जागा मिळवली होती. या दोन्ही खेळाडूंनी 'सुपर फोर' फेरीत दक्षिण कोरियावर मात करताना महत्त्वपूर्ण गोल केले आणि संघाच्या यशात मोठा वाटा उचलला. त्यांचे शालेय प्रशिक्षक विकास भुजबळ यांनी या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. या दोघींनी केलेल्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.