गोखळी (ता. फलटण):* मौजे गोखळी फलटण–आसू रस्त्यावरील गोखळी पाटी येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.सुमारे तीन वर्षांपूर्वी या ओढ्यावर पूल बांधण्यात आला. मात्र, पूल बांधताना त्यातून निघालेली माती ओढ्यातच टाकण्यात आली. परिणामी ओढ्याचा प्रवाह क्षमता कमी झाला असून, मे महिन्यात झालेल्या पावसात ओढ्याला पूर आला होता.मे महिन्यात आलेल्या या पुरामुळे ओढ्यालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय ओढ्यालगत असणाऱ्या वस्तीतील घरांमध्येही पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच फलटण- आसू रोडचे काम चालू असल्यामुळे रोडची उंची वाढलेली आहे त्यामुळे पुराचा धोका अधिकच वाढलेला आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जर वेळेत ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण झाले असते, तर हे नुकसान टाळता आले असते. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने ओढ्याची सफाई करून खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे.