फलटण (प्रतिनिधी): राजकारणात केवळ टीका-टिप्पणी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आकडेवारी आता समोर आली आहे. फलटणचे भाग्यविधाते आणि विधानपरिषदेचे ज्येष्ठ सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात फलटण तालुक्यातील महत्त्वाच्या पाच रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल १४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. 'विकासकामांचा धडाका' म्हणजे काय असतो, हेच जणू रामराजेंनी या कामांतून सिद्ध करून दाखवले आहे.
रामराजे साहेबांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार, खालील प्रमुख रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे:
१. गुणवरे ते निंबळक परिसर: मेखळी-गोखळी-गुणवरे-निंबळक-पिंपरद या महत्त्वाच्या रस्त्यावरील गुणवरे ते निंबळक या भागाच्या सुधारणेसाठी ३ कोटी (३०० लाख) रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
२. दत्तनगर ते आंदारूड पट्टा: प्रजिमा ७ ते पवारवाडी, हनमंतवाडी, मुंजवडी, राजुरी, कुरावली ते आंदारूड या मार्गावरील दत्तनगर ते आंदारूड या टप्प्यातील रस्ता सुधारणेसाठी ३ कोटी (३०० लाख) रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
३. आरडगाव ते हिंगणगाव रस्ता: प्ररामा १५ ते कापडगाव, आरडगाव, हिंगणगाव, कापशी, आळाजापूर या मार्गावरील आरडगाव ते हिंगणगाव या भागाच्या कामासाठी २.५० कोटी (२५० लाख) रुपये मंजूर झाले आहेत.
४. सोनगाव ते सरडे रस्ता रुंदीकरण: पाडेगाव, रावडी, मुरूम, होळ, जिंती, सांगवी, सरडे, आसू या मार्गावरील सोनगाव ते सरडे या भागाच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी २.७५ कोटी (२७५ लाख) रुपयांचा निधी खेचून आणला आहे.
५. फडतरवाडी ते गारेपिरेवाडी: प्रजिमा ६ ते मुरूम, पिंपळवाडी, फडतरवाडी ते प्रजिमा १० या मार्गावरील फडतरवाडी ते गारेपिरेवाडी या टप्प्यातील रस्ता सुधारणेसाठी २.७५ कोटी (२७५ लाख) रुपये मंजूर झाले आहेत.
दळणवळणाच्या या कामांमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत नेणे सोपे होईल आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. रामराजे साहेबांच्या या 'मास्टरस्ट्रोक'मुळे फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.