फलटण/बारामती (प्रतिनिधी): रस्त्यावर दगड मारणारी, स्वतःच्याच विश्वात हरवलेली आणि बेवारस समजली जाणारी एक मनोरुग्ण महिला... पण तिच्या हातावर गोंदलेल्या एका नावाने आणि समाजसेवकांच्या जिद्दीने तिला पुन्हा तिच्या मुलांच्या कुशीत पोहचवले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस आणि 'मनोबल आसरा' फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांतून जेजुरी येथील सुरेखा हनुमंत जगताप या मातेची आपल्या मुलांशी दोन दिवसांनंतर सुखरूप पुनर्भेट झाली.
दोन दिवसांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे अंमलदार विलास ओमासे यांनी 'मनोबल आसरा' फाउंडेशनला माहिती दिली की, एक मनोरुग्ण महिला रस्त्यावरील नागरिकांना दगड मारत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच फाउंडेशनचे राजेंद्र गावडे पाटील आणि सदस्य किशोर कुमार खलाटे (करंजे पूल, ता. बारामती) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या महिलेला अत्यंत विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
महिलेला फाउंडेशनच्या केंद्रात दाखल केल्यानंतर तिची तपासणी करताना हातावर 'सुरेखा हनुमंत' असे नाव गोंदलेले आढळले. दुसऱ्या दिवशी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. उपचारांनंतर तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने आपली मुले सनी, विकी, मुलगी प्रिया आणि पती हनुमंत जगताप यांची नावे सांगितली. तसेच ती जेजुरी (ता. पुरंदर) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली.
महिलेची ओळख पटताच पोलिसांनी तातडीने जेजुरी परिसरात संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेतला. सुदैवाने, तिची मुले आपल्या आईला नेण्यासाठी तत्काळ तयार झाली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे एपीआय नागनाथ पाटील, विलास ओमासे, श्री. माडकर आणि महिला पोलीस शुभांगी दणाने यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. अखेर सर्व रीतसर प्रक्रिया पूर्ण करून त्या मातेला तिच्या मुलांच्या स्वाधीन करण्यात आले.
"एक आई आपल्या मुलांपासून दुरावणे हे अत्यंत क्लेशदायक असते. पण पोलीस प्रशासन आणि आमच्या सदस्यांच्या मदतीने आम्ही या मातेला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकलो, याचे समाधान मोठे आहे."
— राजेंद्र गावडे पाटील (अध्यक्ष, मनोबल आसरा फाउंडेशन)
मानुसकी जपणाऱ्या या कार्याचे फलटण आणि बारामती परिसरातून मोठे कौतुक होत आहे.