फलटण: प्रतिनिधी स्त्री शक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केल्याने समाजातील महिलांच्या कर्तृत्वाला नवे प्रोत्साहन मिळते. जैन सोशल ग्रुपने गेली १५-२० वर्षे सामाजिक क्षेत्रात जपलेली ही परंपरा खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवपूर्ण उद्गार श्री. अरिंजयकाका शहा यांनी काढले.
जैन सोशल ग्रुप, फलटणच्या वतीने 'जागतिक महिला दिना'निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष अनिलकाका शहा (सराफ), MARC महिला सबलीकरण कमिटी कन्वेनर सौ. स्मिता शहा, योगा कमिटी कन्वेनर सौ. सविता दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, इव्हेंट चेअरमन तुषार शहा, संचालक डॉ. मिलिंद दोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जैन सोशल ग्रुपमधील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:
सौ. सविता दोशी व सौ. स्मिता शहा
सौ. निना कोठारी (सचिव, JSG)
सौ. मनिषा घडिया (संचालिका)
सौ. मनिषा व्होरा (अध्यक्षा, संगिनी फोरम)
सौ. वृषाली गांधी (सचिव) व सौ. विनयश्री दोशी (खजिनदार)
सौ. दीप्ती राजवैद्य (निवेदिका) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. अपर्णा जैन आणि सौ. विनयश्री दोशी यांनी सादर केलेल्या मंगलाचरणाने झाली. सौ. मनिषा घडिया यांनी फेडरेशन सूत्राचे वाचन केले. ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे नेटके आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. दीप्ती राजवैद्य यांनी केले.
या सोहळ्याला जैन समाजातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या या गौरव सोहळ्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.