राजुरीतील युवा नेते सचिनशेठ पवार यांच्याकडून धाडसी चालकाचा विशेष सत्कार; 'आर्यन उद्योग समूहा'च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित होती सहल.
फलटण (प्रतिनिधी): नशिबाची साथ आणि चालकाचा कमालीचा प्रसंगावधान यांचा प्रत्यय नुकताच पुणे-बेंगलोर हायवेवर आला. राजुरी (ता. फलटण) येथील युवा नेते व उद्योजक सचिनशेठ तुळशीराम पवार यांच्या वाढदिवसाचे आणि आर्यन उद्योग समूहाच्या १९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या देवदर्शन सहलीवर काळाने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटी चालक गुलाब कोलवडकर यांच्या 'स्टिअरिंग'वरील मजबूत पकडीमुळे मोठा अनर्थ टळला आणि सुमारे ४२ महिला सुखरूप बचावल्या.
राजुरी चौफुला (कुरवली पाटी) वार्ड क्रमांक १ मधील महिलांसाठी दोन एसटी बसद्वारे (MH 14 LX 5596) मोफत आदमापूर देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. महिला भक्तीभावात असताना, पुणे-बेंगलोर हायवेवर किणी वाठार टोल नाक्याच्या पाठीमागे वारणा नदीच्या पुलाजवळ अचानक बसचा पुढचा टायर मोठ्या आवाजात फुटला.
एकीकडे वारणा नदीचे पात्र आणि दुसरीकडे वेगात असलेली बस, अशा स्थितीत बस पलटी होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालक गुलाब कोलवडकर (बॅच नं. १५४४४) यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, जीवाचे रान करत बसवर ताबा मिळवला. "वेळ आली होती, पण काळ आला नव्हता" याचा अनुभव बसमधील महिलांनी घेतला.
सहलीचा हा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण झाल्यानंतर, महिलांच्या सुरक्षिततेसाठी देवदूतासारख्या धावून आलेल्या दोन्ही चालकांचा गौरव करण्यात आला. युवा नेते सचिनशेठ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालक गुलाब कोलवडकर आणि श्रीकांत निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर:
"महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमच्यावर होती. टायर फुटल्यानंतर क्षणभर काळजाचा ठोका चुकला, पण बस सुरक्षित थांबवू शकलो याचे समाधान आहे."
— गुलाब कोलवडकर (चालक)
या घटनेनंतर राजुरी परिसरात सचिनशेठ पवार यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत असतानाच, एसटी चालकांच्या सतर्कतेबद्दल सर्व स्तरातून मानाचा मुजरा दिला जात आहे.