फलटणसह कोरेगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पुरवठा विभागाची मोठी 'रेड'
फलटण: प्रतिनिधी जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरुद्ध पुरवठा विभागाने आता कंबर कसली असून, गेल्या दोन दिवसांपासून फलटण आणि कोरेगाव तालुक्यात धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईत विविध हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 'रुचीसागर' हॉटेलवर रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पथकाने छापा टाकला. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे व त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत हॉटेलमध्ये घरगुती वापराचे ३ LPG सिलेंडर बेकायदेशीररित्या वापरले जात असल्याचे रंगेहात पकडले. या सिलेंडरचे क्रमांक २५३१४३ P, ५१९४१० आणि ९११४२२५ असे असून, जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे ६,६०० रुपये आहे.
फलटण तालुक्यातही पुरवठा विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी नितीन कांबळे व पुरवठा निरीक्षक अश्विनी पोहरे यांच्या पथकाने शहरातील नामांकित हॉटेल्स आणि चायनीज सेंटर्सची तपासणी केली. या मोहिमेत एकूण १३ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
कारवाई झालेली ठिकाणे आणि जप्त सिलेंडर:
हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कोणत्याही व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणे हे 'लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (पुरवठा व वितरण नियंत्रण) आदेश २०००' नुसार गंभीर गुन्हा आहे. "घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल," असा स्पष्ट इशारा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सध्या जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरसह संबंधित व्यवस्थापनावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.