फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील बरड गावच्या हद्दीत आज रविवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. महिंद्रा पिकअप आणि हुंडई व्हेन्यू कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवार दिनांक १५ मार्च रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास फलटण-पंढरपूर रस्त्यावरील बरड गावच्या शिवारात हा अपघात झाला. महिंद्रा पिकअप आणि हुंडई कंपनीची व्हेन्यू कार एकमेकांना धडकल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना वाहनातून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी तसेच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही.