सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने 32 जागांवर संख्याबळ दाखवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद घेतले ताब्यात तर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 31 संख्याबळ दाखवू शकले
सातारा: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा हायव्होल्टेज ड्रामा अखेर भाजपच्या विजयाने संपला आहे. एखाद्या बिग बजेट सिनेमालाही लाजवेल अशा नाट्यमय घडामोडींनंतर सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला असून, अध्यक्षपदी प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची वर्णी लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याच्या राजकारणात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने आणि गुप्त हालचालींनी साताऱ्याचा पारा वाढवला होता. जणू एखादा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा सुरू असावा, तशाच प्रकारे सदस्यांची पळवापळवी, रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि ऐनवेळी बदललेली समीकरणे पाहायला मिळाली. सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र भाजपने सर्व डावपेच उलटवून लावत सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली.
नव्या नेतृत्वाचा उदय"हा विजय साताऱ्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय असेल."
— नूतन पदाधिकारी
निकाल जाहीर होताच जिल्हा परिषद परिसराबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष केला. "कोण आली रे कोण आली, भाजपची वाघीण आली" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या निकालाने साताऱ्याच्या राजकारणात भाजपची पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.