फलटण: प्रतिनिधी
येथील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर उत्साहात संपन्न झाला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याविष्काराने आणि कलागुणांनी उपस्थित पालकांना व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
शिस्त आणि गुणवत्तेचा संगम
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्रांतपाल लायन्स महाराष्ट्र भोजराज नाईक निंबाळकर यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती उपस्थित होते. यावेळी बोलताना मठपती यांनी शाळेच्या शिस्तीचे कौतुक केले. ते म्हणाले, "आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी बरोबरी करत या शाळेने आपली पटसंख्या केवळ शिस्त आणि गुणवत्तेमुळे टिकवून ठेवली आहे. पालकांनी मुलांवर आपले विचार न लादता त्यांची कुवत ओळखून त्यांना पाठबळ द्यावे."
विविध गुणदर्शन व 'भरारी'चे प्रकाशन
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच 'भरारी यशोगाथा' या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी:
देशभक्तीपर गीते व योगा थीम
राधा-कृष्ण आणि कोळीगीत
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडे
लयबद्ध तबला वादन व गायन
अशा विविध कलाप्रकारांनी रंगमंच गाजवून सोडला. विशेष म्हणजे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातवीच्या विद्यार्थिनींनी अत्यंत आत्मविश्वासाने केले.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी शाळा समिती चेअरमन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, नूतन शिंदे, वसुंधरा नाईक निंबाळकर, शिरीष भोसले, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, प्रियंका लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी विद्यार्थी निखिल भोसले (आयकर अधिकारी) व सृष्टी धुमाळ (कृषी अधिकारी) यांनीही शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रगतीचा आढावा
मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कै. श्रीमंत निर्मलाराजे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी ही शाळा कशी उभी राहिली, याचा प्रवास त्यांनी स्क्रीनवर छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रूपाली कदम यांनी केले, तर बक्षीस वितरणाचे निवेदन सौ. माधुरी काशिद यांनी केले. अतिथी परिचय श्री. चव्हाण यांनी करून दिला व समारोप अर्पिता कदम हिने केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व पालकांनी विशेष
परिश्रम घेतले.