सातारा | प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी सातारा शहरात राज्यस्तरीय ‘माय भारत’ (मेरा युवा भारत) मेगा पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत जिल्हाभरातून १० हजारांहून अधिक नागरिक, विद्यार्थी, खेळाडू आणि कलाकार सहभागी होणार असून, ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, क्रीडा मंत्रालयाचे राज्य निर्देशक कालिदास घाटवळ, जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ठळक वैशिष्ट्ये आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना:
नोंदणी: पदयात्रेत सहभागी होणाऱ्या १० हजार नागरिकांनी 'माय भारत' पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
वातावरण निर्मिती: पदयात्रा मार्गावरील प्रत्येक चौकात साऊंड सिस्टीमद्वारे शिवकालीन पोवाडे वाजवून संपूर्ण सातारा शहर 'शिवमय' करण्यात येईल.
शिस्त आणि सहभाग: एनसीसी (NCC) आणि एनएसएस (NSS) चे विद्यार्थी त्यांच्या अधिकृत ड्रेसकोडमध्ये सहभागी होतील. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये शिवचरित्रावर आधारित व्याख्याने आयोजित केली जातील.
स्वच्छता व आरोग्य: पदयात्रा मार्ग पूर्णपणे कचरामुक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सहभागींसाठी पाणी, अल्पोपहार आणि मार्गावर रुग्णवाहिकेची (Ambulance) तैनात व्यवस्था असेल.
सांस्कृतिक कार्यक्रम: पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी शिवकालीन युद्धकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाईल.
"तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक आणि शौर्याचा वारसा कळावा, हा या मेगा पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. पोलीस विभागाने सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही."
— संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा.