फलटणमध्ये नववधूने दिला प्रेरणादायी संदेश
फलटण (प्रतिनिधी):लग्नाचा मांडव सजला होता, सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते आणि अक्षता पडण्याची वेळ जवळ आली होती. मात्र, अशाही घडीला एका नववधूने आपल्या वैयक्तिक आनंदापेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
फलटण तालुक्यातील ऋतुजा क्षीरसागर या नववधूचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नाची धावपळ, नटणे-थटणे आणि विधींची लगबग सुरू असतानाच ऋतुजाने एक धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. विवाह मंडपात पाऊल ठेवण्यापूर्वी तिने थेट सोनवडी येथील मतदान केंद्र गाठले.
आधी मतदान, मगच लग्न असा ठाम निर्धार करत ऋतुजाने रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. लग्नाच्या पोशाखात, अंगावर दागिने आणि हातावर मेहंदी असलेल्या या नववधूला मतदान केंद्रावर पाहून उपस्थित नागरिकही भारावून गेले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला आहे.
ऋतुजाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विशेषतः तरुण मतदारांसाठी ही घटना अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. 'लग्नासारख्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशीही तिने मतदानाचे कर्तव्य विसरले नाही', अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.