सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भावनांशी खेळ; ऑनलाइन बँकिंगच्या नावाखाली केवळ टोलवाटोलवी!
फलटण (प्रतिनिधी):शहरातील अत्यंत गजबजलेल्या डेक्कन चौक, उपळेकर मंदिराजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा कारभार सध्या रामभरोसे चालला असून, येथील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणामुळे आणि निकृष्ट कामाच्या दर्जामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बँक ग्राहकांसाठी आहे की ग्राहक बँकेसाठी? असा संतप्त सवाल आता फलटणकर विचारत आहेत.
तालुक्यातून कानाकोपऱ्यातून शेतकरी, कष्टकरी आणि प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आपल्या पेन्शन किंवा कर्जाच्या कामासाठी या शाखेत येतात. मात्र, तासनतास रांगेत उभे राहूनही त्यांना समाधानकारक वागणूक मिळत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागवण्याऐवजी, येथील कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप होत आहे.
शासनाकडून ऑनलाइन बँकिंगचा गाजावाजा केला जात असताना, या शाखेत मात्र चित्र उलटे आहे. एका प्रतिष्ठित कंपनीचे १ लाख रुपये बॅलन्स असलेले खाते 'ऑनलाइन' करण्यासाठी बँक प्रशासन गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून टाळाटाळ करत आहे. जर मोठ्या ठेवीदारांची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऑनलाइन कामासाठी येणाऱ्या ग्राहकांना तांत्रिक कारणांचे दाखले देऊन परत पाठवले जाते, ज्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
बँकेचे मॅनेजर आपल्या केबिनमध्ये शांत बसून असतात, मात्र बाहेर ग्राहकांचे काय हाल होत आहेत याकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसते. "मॅनेजर साहेब, थोडं बँकेच्या कामात आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत लक्ष द्या," अशी मागणी आता दबक्या आवाजात नव्हे, तर उघडपणे बँक धारकांमधून होत आहे.
प्रमुख समस्या ज्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे:
- ऑनलाइन बँकिंग सुविधेसाठी महिनोंन महिने प्रतीक्षा.
- ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी हीन दर्जाची वागणूक.
- कामात पारदर्शकतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी.
- तांत्रिक कामांसाठी ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारण्यास लावणे.
जर या शाखेच्या कारभारात सुधारणा झाली नाही, तर ग्राहक वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. आता तरी बँक प्रशासन आपली झोप उडवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार का, की ग्राहकांना असाच मनस्ताप सहन करावा लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.