फलटण:फलटण तालुक्यातील मलठण येथील सराईत गुन्हेगारांनी वाई परिसरात धुमाकूळ घातला होता. ट्रान्सफॉर्मरमधील (डीपी) तांब्याची तार चोरणाऱ्या या टोळीचा वाई पोलिसांनी पर्दाफाश केला असून, यात फलटणच्या ३ सराईत गुन्हेगारांसह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मलठण (फलटण) येथील तीन जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील अनिकेत बनसोडे आणि अर्जुन जाधव हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आधीच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तडीपार असूनही हे गुंड वाई परिसरात चोऱ्या करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक केलेले आरोपी:
१. मुकेश माणिक जाधव (४५, मलठण, फलटण)
२. अनिकेत सुभाष बनसोडे (२२, मलठण, फलटण - तडीपार)
३. अर्जुन राजू जाधव (२०, मलठण, फलटण - तडीपार)
४. रोहन लाखन घाडगे (२४, यशवंतनगर, वाई)
५. विजय बाबुराव शिंदे (३६, यशवंतनगर, वाई)
६. मनोज नामदेव घाडगे (४०, यशवंतनगर, वाई)
धोम कॅनॉल परिसरात वारंवार होणाऱ्या तांब्याच्या चोरीमुळे शेतकरी हैराण झाले होते. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा लावून या टोळीला जेरबंद केले.
मुद्देमाल काय जप्त झाला?
- ३०० किलो तांब्याची तार
- १ चारचाकी गाडी व २ दुचाकी
- ५ मोबाईल फोन
- एकूण किंमत: १७ लाख रुपये
मलठण येथील आरोपींचा वाईमधील गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने फलटण परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे. तडीपार आरोपी शहराबाहेर जाऊन असे गंभीर गुन्हे करत असल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांनी आता अधिक कडक पावले उचलली आहेत.