फलटण/विडणी: गेल्या काही तासांपासून फलटण तालुक्यातील कोकरे वस्ती आणि विडणी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या रानगव्याला पकडण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. अत्यंत थरारक अशा या मोहिमेनंतर रानगवा जेरबंद झाल्याने स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
सकाळच्या सुमारास राजेंद्र सदाशिव जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर हा रानगवा नाना अभग वस्तीच्या दिशेने सरकला होता. सुरुवातीला "पकडू शकत नाही, फक्त हाकलून देऊ शकतो" अशी भूमिका घेणाऱ्या वनविभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रेस्क्यू टीम पाचारण केली. स्थानिक तरुण आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या अवाढव्य रानगव्याला सुरक्षितपणे जाळ्यात अडकवले.
रानगवा पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि भीतीचे सावट दूर झाले. गेल्या काही तासांपासून शेतात आणि घराबाहेर पडण्यास घाबरणाऱ्या विडणीकरांनी वनविभागाच्या या यशस्वी मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः ज्या भागात गव्याचा वावर होता, त्या वस्तीवरील नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.