वाई (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा तालुक्याला सोमवारी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. वाई तालुक्यातील आसले गावच्या हद्दीत पांडवनगर येथे मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळून १६ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आसले (ता. वाई) येथील मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ हे नेहमीप्रमाणे आपला मेंढ्यांचा कळप घेऊन पांडवनगर शिवारात चरण्यासाठी गेले होते. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि गारपिटीसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी विजांचा कडकडाट इतका भयानक होता की, एक जोरदार वीज थेट मेंढ्यांच्या कळपावर कोसळली.
या भीषण घटनेत १६ मेंढ्या जागीच ठार झाल्या. मेंढपाळ नंदकुमार पिसाळ हे देखील या विजेच्या धक्क्याने जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आपल्या डोळ्यांसमोर पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या १६ मेंढ्यांचा मृत्यू पाहून मेंढपाळ पूर्णपणे हतबल झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे पथक आणि महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजीराव तोडरमल, पोलीस पाटील आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सिसोदिया यांनी मृत मेंढ्यांची तपासणी केली. तसेच चंद्रकांत भोसले, सुहास कांबळे, होमगार्ड सुशांत धुरगुडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मेंढपाळ हा पूर्णपणे आपल्या पशधनावर अवलंबून असतो. एकाच वेळी १६ मेंढ्या दगावल्याने नंदकुमार पिसाळ यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाचे सावट आहे. विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर आश्रय घेणे धोक्याचे ठरू शकते. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकरी-मेंढपाळ बांधवांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.