फलटण (प्रतिनिधी): पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक वाण आणि थेट विक्रीचे तंत्र अवलंबल्यास कमी क्षेत्रातही बक्कळ नफा मिळवता येतो, हे फलटण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील बोराटे बंधूंनी सिद्ध केले आहे. जनार्दन आणि मनोहर बोराटे या दोन भावांनी आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रात 'मॅक्स' जातीच्या कलिंगडाचा यशस्वी प्रयोग करत अवघ्या ८० दिवसांत २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. हे ओळखून बोराटे बंधूंनी व्यावसायिक शेतीसाठी 'मॅक्स' या कलिंगडाच्या जातीची निवड केली. या फळाचा गर गडद लाल, रसाळ आणि अत्यंत गोड असल्याने ग्राहकांकडून याला मोठी मागणी असते.
डिसेंबरच्या सुरुवातीला त्यांनी अर्ध्या एकरात सुमारे चार हजार रोपांची योग्य अंतर राखून लागवड केली. लागवडीपासून ते काढणीपर्यंत खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण यावर विशेष लक्ष दिल्याने अवघ्या ८० दिवसांत पीक काढणीस तयार झाले.
बाजारपेठेत व्यापाऱ्यांना माल विकण्याऐवजी बोराटे बंधूंनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी लोणंद-फलटण मार्गावरील चांदोबाचा लिंब, विठ्ठलवाडी फाटा आणि बडेखान या तीन मोक्याच्या ठिकाणी स्वतःचे स्वतंत्र विक्री स्टॉल उभारले.
उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच कलिंगड विक्रीला आल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दररोज दीड ते दोन टन फळांची विक्री झाली. त्यांनी २० ते २५ रुपये प्रति किलो असा रास्त दर ठेवल्याने ग्राहकांनीही खरेदीला पसंती दिली.
बोराटे बंधूंनी अर्ध्या एकरातून सुमारे १० टन कलिंगडाचे उत्पादन घेतले. साधारण ४ ते ५ किलो वजनाचे एक फळ याप्रमाणे आठवडाभरात सर्व माल विक्री झाला. या प्रयोगासाठी त्यांना सुरुवातीला ६० हजार रुपयांचा खर्च आला होता. मात्र, थेट विक्रीमुळे त्यांना सुमारे २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, सर्व खर्च वजा जाता चांगला नफा हाती आला आहे.
या यशाबद्दल बोलताना जनार्दन बोराटे म्हणाले, "आम्ही नेहमी नवनवीन पिके घेण्याचा प्रयत्न करतो. कमी कालावधीत जास्त नफा मिळवण्यासाठी कलिंगडाची लागवड केली होती. कुटुंबातील सर्वांनी लागवड, जोपासना आणि विक्रीपर्यंत घेतलेल्या मेहनतीमुळेच हा प्रयोग यशस्वी झाला."
कमी पाण्यात आणि कमी क्षेत्रात घेतलेल्या या उत्पन्नामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोराटे बंधूंच्या या प्रयोगाची मोठी चर्चा होत असून, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर शेती फायदेशीर ठरू शकते, असा संदेश त्यांनी दिला आहे.