फलटण (प्रतिनिधी): आज गुरुवार, २६ मार्च रोजी 'प्रभू श्रीरामचंद्र' यांच्या जन्मोत्सवानिमित्त फलटण शहर आणि परिसरात भक्तिमय वातावरणासह प्रचंड उत्साहाचा सोहळा पाहायला मिळाला. रामनवमीच्या निमित्ताने शहरातील श्रीराम मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी जमली होती, तर सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले.
पहाटेपासूनच फलटणमधील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. 'श्रीराम जय राम जय जय राम'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांनी भली मोठी रांग लावली होती. भर उन्हाची तमा न बाळगता अबालवृद्धांनी दर्शनासाठी तास न् तास संयमाने प्रतीक्षा केली.
जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे सायंकाळी निघालेली जंगी मिरवणूक. या मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या हाय-वोल्टेज डीजेच्या तालावर तरुण मोठ्या संख्येने थिरकताना दिसले.
केवळ डीजेच नव्हे, तर मिरवणुकीत सादर करण्यात आलेले विविध देखावे हे आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले. रामायणातील प्रसंग आणि सामाजिक विषयांवर आधारित देखावे पाहण्यासाठी फलटण तालुक्यातून नागरिकांनी शहरात मोठी गर्दी केली होती.
मिरवणुकीत गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेल्याने शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात सुरू होता.