फलटण: "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम..." या जयघोषाने अवघी आळंदी दुमदुमण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्ती, परंपरा आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी यंदा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला माऊलींचा अश्व आणि पालखी सोहळा १७ जुलै रोजी फलटण नगरीत विसावणार आहे.
पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी आळंदी येथील नियोजन बैठकीनंतर ही अधिकृत माहिती दिली. १७ दिवसांच्या या पायी प्रवासानंतर २४ जुलै रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल, तर २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडेल.
यंदाच्या वारीमध्ये वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ४ गोल आणि ३ उभे रिंगण सोहळे रंगणार आहेत. फलटण तालुक्याच्या दृष्टीने यावर्षीचे वेळापत्रक अत्यंत उत्साहाचे असणार आहे.
आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मठात वारीच्या नियोजनासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार आणि दिंडी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चैत्र दशमीपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार, प्रस्थान आणि मुक्कामाच्या वेळापत्रकाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता लाखो वारकरी शेकडो किलोमीटरची ही पदयात्रा पूर्ण करतात. फलटण परिसरातून मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. वारकऱ्यांची ही ओढ लक्षात घेऊन, त्यांना वाटेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडे आरोग्य, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या चोख सोयी-सुविधांबाबत मागण्या मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
"वारी ही केवळ यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि सामूहिक श्रद्धेचा जिवंत वारसा आहे. प्रत्येक वारकरी नव्या उत्साहाने या वारीत सहभागी होत असतो," असे मत विश्वस्त मंडळाने व्यक्त केले.