५६ लाखांच्या जमीन व्यवहारातून खोट्या तक्रारीचा डाव; धुळदेव कोरे यांचा पोलीस प्रशासनाकडे गंभीर अर्ज
फलटण (प्रतिनिधी):तालुक्यातील भाडळी खुर्द येथील जमिनीच्या वादाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. ३.५ एकर जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादात, संपत बाळासाहेब सोनवलकर यांनी पोलिसांना पिस्तूल संदर्भात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. अर्जदार श्री. धुळदेव बळीबा कोरे यांनी याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली असून, व्यावसायिक बंधूंना वाचवण्यासाठी आणि आपल्याला फसवण्यासाठी हा बनाव रचल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर सर्जेराव सोनवलकर आणि संजय सर्जेराव सोनवलकर हे दोघेही व्यावसायिक असून, त्यांना या प्रकरणात चुकीची साथ देत संपत बाळासाहेब सोनवलकर यांनी पोलिसांना घटनास्थळी पिस्तूल नसतानाही असल्याची खोटी माहिती पुरवली. केवळ दबाव निर्माण करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा बनाव रचला गेल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांनी दवाखान्यात जाऊन खोटे नाटक केल्याचाही आरोप होत आहे.
मौजे भाडळी खुर्द येथील गट नंबर २४7 मधील ३.५ एकर जमिनीचा व्यवहार ५६ लाख रुपयांना ठरला होता. त्यापैकी ५० लाख रुपये चेकद्वारे देण्यात आले होते, तर उर्वरित ६ लाख रुपये मध्यस्थ दादासो भिसे (रा. कांबळेश्वर) यांच्यामार्फत पोहोचवण्यात आले होते. मात्र, व्यवहार पूर्ण करण्याऐवजी आता खोट्या तक्रारींचा आधार घेऊन अर्जदाराला अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील बाळू विठ्ठल सोनवलकर यांच्यावर यापूर्वीच न्यायालयामध्ये जमीन घोटाळ्यांबाबत विविध गुन्हे दाखल आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, पुन्हा एकदा नवीन जमीन हडपण्यासाठी किंवा आर्थिक फसवणुकीसाठी हा खोटा गुन्ह्याचा कट रचला गेल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धुळदेव कोरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि फलटण ग्रामीण पोलिसांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालवणाऱ्या आणि सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या संपत सोनवलकर व त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई व्हावी.
"पिस्तूल नसतानाही तशी खोटी माहिती देऊन संपत सोनवलकर यांनी पोलिसांची दिशाभूल केली आहे. हा केवळ आम्हाला फसवण्यासाठी रचलेला कट आहे. प्रशासनाने यातील सत्यता तपासून आम्हाला न्याय द्यावा."
— धुळदेव बळीबा कोरे (अर्जदार)