फलटण : पैशांच्या वादातून चिपळूण शहर येथून एका तरुणांचे अपहरण झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील एका घटनेत फलटण तालुक्यातील लोणंद-काळज परिसरातील संशयित आरोपींचा समावेश असल्याने सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
चिपळूण शहरातील काविळतळी येथे ८ एप्रिल रोजी अपहरणाची ही घटना घडली. याबाबत प्रकाश मार्तंडराव पवार (वय ७०, रा. काविळतळी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा शुभम (वय २९) याचे पैशांच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी फलटण तालुक्यातील काळज (लोणंद) येथील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ चव्हाण आणि वैभव साकुंडे (दोघेही रा. काळज, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
फिर्यादी प्रकाश पवार आणि त्यांचा मुलगा शुभम यांचे या संशयित आरोपींशी पैशांचे काही व्यवहार झाले होते. याच आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून संशयितांनी शुभमचे अपहरण केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एकीकडे ही घटना ताजी असतानाच, ३ एप्रिल रोजी सावर्डे येथूनही एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण झाले होते. अवघ्या पाच दिवसांच्या अंतरात अपहरणाच्या दोन मोठ्या घटना घडल्याने चिपळूण पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
सध्या चिपळूण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, फलटण तालुक्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे लोणंद आणि काळज परिसरात चर्चेला उधाण आले आहे.