१ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त; विधीसंघर्षित बालकासह टोळीचा उलगडा
वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी):वडगाव निंबाळकर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्तरीत्या धडक कारवाई करत आंतरजिल्हा दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तीन मोटारसायकलींसह १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, यात फलटण ग्रामीण आणि लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
या तपासाचे मूळ कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील कठीण पूल परिसरातून चोरीला गेलेल्या एका लाल रंगाच्या दुचाकीत (MH 42 AP 9496) दडले होते. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता चोरीच्या मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला.
तपासादरम्यान आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, त्याने त्याचा मित्र मयूर नितीन भोसले (रा. कालठण, ता. इंदापूर) व इतर दोन साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्या होत्या. यामध्ये:
आरोपींनी या तिन्ही दुचाकी कोऱ्हाळे खुर्द-होळ रोडवरील पुलाजवळील झुडपांमध्ये लपवून ठेवल्या होत्या, ज्या पोलिसांनी सापळा रचून हस्तगत केल्या आहेत.
केवळ दुचाकीच नव्हे, तर आरोपींनी वडगाव परिसरातील होळ येथे एक बंद घर फोडून चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. या कारवाईमुळे वडगाव निंबाळकर, फलटण ग्रामीण आणि लोणंद पोलीस ठाण्यांमधील एकूण चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.