फलटण एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्याचा मानस
फलटण (प्रतिनिधी):
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी सुरू करण्यात आलेली 'मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षा' (माध्यमिक विभाग) अत्यंत यशस्वी ठरली आहे. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या चित्रकला वर्गात उत्साहात पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती देवी व श्रीमंत मुधोजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सोहळ्यात इयत्ता ५ वी ते ९ वी मधील एकूण ५००० प्रविष्ट विद्यार्थ्यांमधून निवडक ७६ गुणवंत विद्यार्थ्यांना 'चॅम्पियन करंडक', रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम म्हणाले की, "या विभागाचे हे दुसरे वर्ष असून पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. संस्थेने 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला असून, आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांचे हे यश पाहून उपक्रम यशस्वी झाल्याचे समाधान वाटते."
जिल्हास्तरीय परीक्षेचे नियोजन
मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षेचे प्रमुख श्री. शामराव आटपाडकर व त्यांच्या टीमच्या प्रयत्नातून आगामी काळात ही परीक्षा जिल्हास्तरावर आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. हेमंत रानडे (खजिनदार) यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. नूतन शिंदे, सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, डॉ. पुरुषोत्तम राजवैद्य (सर्व सदस्य गव्हर्निंग कौन्सिल), दिलीप राजगुडा (कार्याध्यक्ष), श्री. वसंत कृष्णा शेडगे (मुख्याध्यापक, मुधोजी हायस्कूल) आणि श्री. अविनाश नरुटे (गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मनोज कदम यांनी केले, तर आभार श्री. शैलेश कदम यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. तृप्ती शिंदे व सुजित जमदाडे यांनी केले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.