गोखळी* *(राधेश्याम जाधव).* वारुगड- फलटण ते आसू रस्त्याच्या कॉंक्रिटिकरणाचे काम सुरू असताना रस्त्यालगत असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. काही झाडे रस्त्यापासून दूर असल्याने शिल्लक राहिली असली, तरी आता त्या झाडांनाही वेगवेगळे क्रमांक देण्यासाठी टेरा बेला ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून त्यांच्या खोडांवर थेट खिळे मारून क्रमांकाचे कागद लावले जात आहेत.
झाडांच्या खोडात खिळे – गंभीर हानीचा धोका.
वृक्षतज्ज्ञांच्या मते झाडे ही सजीव असल्याने खोडात खिळे मारल्याने झाडांच्या सालीला व अंतर्गत ऊतकांना इजा होते.
यामुळे—
बुरशीजन्य रोग,
किडींचा प्रादुर्भाव,
पाणी व अन्नद्रव्यांच्या प्रवाहात अडथळा,
झाड आतून पोखरणे,
वाढ खुंटणे
अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ही कृती पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक असून झाडांच्या दीर्घायुष्यास धोका निर्माण करते.
‘झाडांना खिळे मारणे हा गुन्हा’ – ग्रामस्थांचा सवाल
वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी वन विभागाचे लक्ष वेधले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की—
झाडांना खिळे मारणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे,
मग अशा स्पष्ट उल्लंघनावर वन विभाग कारवाई करणार का?
रस्त्याचे काम आवश्यक असले तरी झाडांचे संरक्षण का नाही?
ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमींकडून या संदर्भात तातडीची चौकशी व संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे.