कोळकी/फलटण:
कोळकी गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन आणि निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते 'दळवी सर' यांची नाभिक समाजातील त्यांच्या प्रदीर्घ कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे. गेल्या २५ वर्षांपासून समाजासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या दळवी सरांच्या या निवडीमुळे फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी
दळवी सर यांची ओळख केवळ एक समाजसेवक म्हणूनच नाही, तर 'मार्शल आर्ट्स' क्षेत्रात इंटरनॅशनल चॅम्पियन म्हणूनही आहे. त्यांनी कराटेमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके पटकावून तालुक्याचे नाव उंचावले आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक दर्जेदार खेळाडू आणि विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या या क्रीडा योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा 'दादोजी कोंडदेव पुरस्कार' देऊनही गौरवण्यात आले आहे.
राजकीय व सामाजिक नेतृत्वाचा विश्वास
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी सरांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत.
जिवाजी महाले चौक: फलटणमध्ये वीर जिवाजी महाले यांचा पुतळा आणि चौक उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
संत सेना महाराज मंदिर: कोळकी येथे भव्य श्री संत सेना महाराज मंदिराच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
रक्तदान शिबिर: श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त कोळकी येथे आजवरचे सर्वात मोठे रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला होता.
नाभिक महामंडळातील २५ वर्षांचा प्रवास
दळवी सर गेल्या २०-२५ वर्षांपासून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे काम निष्ठेने करत आहेत. यापूर्वी त्यांनी:
दोन वेळा जिल्हा उपाध्यक्ष
एक वेळा कार्याध्यक्ष
एक वेळा जिल्हा संघटक
अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क आणि कामाचा दांडगा अनुभव पाहूनच महामंडळाने त्यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पुणे येथे सलून व्यवसायाचे विशेष प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायातही मोठी प्रगती केली आहे. सर्वांच्या सुख-दुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून 'दळवी सर' परिचित आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे