सातारा | प्रतिनिधी: मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या उदात्त हेतूने राज्य शासनाने सुरू केलेल्या 'लेक लाडकी' योजनेला सातारा जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ हजार ५३३ मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती अधिकारी हेमंत कुमार चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी स्थिती
शासकीय आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.
सन २०२३-२४: २,००० मुलींना लाभ मिळाला.
सन २०२४-२५: ४,५३३ मुलींना लाभ मिळाला.
अशाप्रकारे दोन वर्षांत एकूण ६,५३३ मुलींच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा झाली आहे.
लाभाचे टप्पे: एकूण १ लाख १ हजार रुपये
या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत विविध पाच टप्प्यांत आर्थिक मदत दिली जाते:
जन्मानंतर: ५,००० रुपये
पहिलीत प्रवेश घेतल्यावर: ६,००० रुपये
सहावीत गेल्यावर: ७,००० रुपये
अकरावीत गेल्यावर: ८,००० रुपये
१८ वर्षे पूर्ण झाल्यावर: ७५,००० रुपये
(अशा प्रकारे एकूण १,०१,००० रुपयांचा लाभ मिळतो.)
योजनेसाठी पात्रतेचे निकष
पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक (रेशनकार्ड) कुटुंबातील मुलींना हा लाभ मिळतो.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
१ एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना ही योजना लागू आहे.
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये झाल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.
विशिष्ट टप्प्यांवर माता-पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थी मुलीचा व पालकांचा जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्डची साक्षांकित प्रत आणि रहिवासी दाखला आवश्यक आहे. तसेच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर अंतिम लाभासाठी ती अविवाहित असणे आणि तिचे नाव मतदार या
दीत असणे आवश्यक आहे.