फलटण (प्रतिनिधी):
पंतप्रधान आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटण शहरासाठी शासनाकडून मोठे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, शहरातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
९९ लाभधारकांना मंजुरी; ३५ लाखांचे अनुदान वितरित
या योजनेतील 'लाभार्थी नेतृत्व बांधकाम' (BLC) घटकांतर्गत फलटण नगरपरिषदेकडे आतापर्यंत २१० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९९ घरकुलांना केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे, या मंजूर घरकुल लाभधारकांना एकूण ३५ लाख रुपयांचे अनुदानही वितरित करण्यात आले आहे.
१२३० घरकुलांचे भव्य उद्दिष्ट
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून फलटण शहराकरिता एकूण १२३० घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शहरात राहणाऱ्या पण हक्काचे घर नसलेल्या नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जास्तीत जास्त इच्छुक नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आपले घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. निखिल जाधव व नगराध्यक्ष मा. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
येथे साधा संपर्क:
या योजनेच्या अटी, शर्ती आणि अर्जाच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती हवी असल्यास नागरिकांनी फलटण नगरपरिषदेमधील 'प्रधानमंत्री आवास योजना कक्षास' प्रत्यक्ष भेट द्यावी, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.