३१ मार्चपर्यंत नाव नोंदणी करणे बंधनकारक; रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
फलटण (प्रतिनिधी): रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, फलटण यांच्यावतीने आणि डॉ. बारकीज होमिओपॅथिक, इस्लामपूर (ईश्वरपूर) यांच्या सहकार्याने शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सरमुळे होणाऱ्या तीव्र वेदनांवर होमिओपॅथिक पद्धतीने मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, या औषधामुळे रुग्णाला अवघ्या दोन दिवसांत फरक जाणवतो. तसेच, ज्यांना चष्मा आहे अशा व्यक्तींना चष्म्यापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी विशेष उपचार दिले जातील. डोळ्यांचे इतर आजार जसे की मोतीबिंदू आणि काचबिंदू यावरही मोफत औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
विविध आजारांवर होणार उपचार: शिबिरामध्ये केवळ कॅन्सर आणि नेत्र विकारच नव्हे, तर जुनाट सर्दी, वारंवार होणारा कफ, खोकला, दमा आणि धाप लागणे यांसारख्या श्वसनविकारांवरही मोफत औषधे दिली जातील. याशिवाय, सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर आणि फंगल इन्फेक्शनवर तज्ज्ञांमार्फत तपासणी करून उपचार केले जाणार आहेत.
पूर्व नोंदणी आवश्यक: सदर शिबिर पूर्णपणे मोफत असले तरी, नियोजनाच्या दृष्टीने इच्छुकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्व नोंदणी नसेल तर ऐनवेळी शिबिरात प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद नागरिकांनी घ्यावी.
या उपक्रमासाठी नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, हॉटेल ब्रह्मा प्युअर व्हेज आणि सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क: अधिक माहितीसाठी ९८६०००४७३०, ७८७५५९१५७०, ९८९००४३६०० किंवा ९४०५३५११७७ या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.