फलटण (प्रतिनिधी): रस्त्यावर नागमोडी आणि वेडीवाकडी गाडी चालवून इतर वाहनधारकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एका मद्यधुंद पिकअप चालकावर फलटण शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नाना पाटील चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी रात्री ८:४५ च्या सुमारास फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश खरात आणि त्यांचे सहकारी नाना पाटील चौक येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना एक पिकअप गाडी (क्रमांक: MH 53 B 0617) अत्यंत वेडीवाकडी आणि धोकादायक पद्धतीने येताना दिसली.
शंका आल्याने पोलिसांनी तत्काळ गाडी थांबवली. चालक प्रविण सुरेश धायगुडे (वय ३२, रा. ब्राह्मणगल्ली, फलटण) याला गाडीखाली उतरवून विचारपूस केली असता, तो बोबड्या भाषेत बोलत होता आणि त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते. त्याच्या तोंडाचा मद्याचा उग्र वास येत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी पंचांसमक्ष 'ब्रेथ ॲनालायझर' मशीनद्वारे चालकाची तपासणी केली. या तपासणीत चालकाच्या शरीरात मद्याचे प्रमाण 58mg/100ml इतके आढळून आले, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे. मद्यप्राशनाचा कोणताही परवाना नसल्याचेही त्याने कबूल केले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रविण धायगुडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र मोटार वाहन नियम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमचा इशारा: "मद्यपान करून वाहन चालवणे हा स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणारा गंभीर गुन्हा आहे. सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा."