फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील धुळदेव येथे एका हॉटेलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, कामगारांचे मोबाईल आणि विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण १९,४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण हरीभाऊ अब्दागिरे (वय ४२) यांचे धुळदेव हद्दीत फलटण-पंढरपूर रोडवर 'अंशीका बार अँड रेस्टॉरंट' नावाचे हॉटेल आहे. बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी रात्री १२:१५ वाजता अब्दागिरे हॉटेल बंद करून घरी झोपायला गेले होते. साधारण पहाटे २:३५ च्या सुमारास हॉटेलवर राहणारा कामगार ऋषिकेश नरुटे हा धावत मालकाच्या घरी आला आणि त्याने हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे सांगितले.
हॉटेल मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने हॉटेलवर जाऊन पाहिले असता, मुख्य दरवाजाचा कोयंडा कशाच्या तरी साहाय्याने तोडलेला होता. चोरट्यांनी हॉटेलमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते. हॉटेलचा काउंटर फोडून चोरट्यांनी खालील मुद्देमाल चोरून नेला:
या घटनेची फिर्याद प्रविण अब्दागिरे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.