फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: सुषमा अंधारेंचा थेट पोलीस प्रशासनावर हल्लाबोल!
फलटण (सातारा): येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Phaltan Doctor Suicide Case) प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी फलटण पोलीस स्टेशनला भेट देऊन तीव्र आंदोलन केले. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या तपासावर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकरणाला 'संस्थात्मक हत्या' ठरवले आहे.
'सहा लोकांवर आरोपपत्र का नाही?' - अंधारेंचा सणसणीत सवाल
पोलीस स्टेशनला अर्ज देण्यासाठी आलेल्या सुषमा अंधारे यांनी थेट पोलीस तपासावर आक्षेप घेतला. त्यांनी स्पष्टपणे विचारणा केली की, या प्रकरणातील अन्य सहा लोकांवर तुम्ही आरोप पत्र (Charge Sheet) का दाखल करत नाही? याचा अर्थ तपास योग्य दिशेने होत नसल्याचा त्यांचा कयास आहे.
'पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास नाही'
अंधारे यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवर पूर्णपणे अविश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीने तपास चालू आहे, ते पाहता 'स्वतःच स्वतःचा तपास करणार का?' असा प्रश्न पडतो. माझा पोलीस डिपार्टमेंट वरती विश्वास नाही.
त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांच्या वर्तनावरही जोरदार टीका केली. डीवायएसपी साहेबांचा जो ॲटिट्यूड (Attitude) होता, हे बघता असं वाटत होतं की डीवायएसपी साहेब आंदोलन स्थळी येऊन उपकार करत होते, असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले.
निवेदन न स्वीकारता उचलून नेले, याचा अर्थ काय?
पोलीस अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याची पद्धतही अंधारे यांना खटकली. निवेदन न देता निवेदन उचलून घेऊन गेले ते, हे फार विशेष आहे. याचा अर्थ काय, दहशत असू शकते, अशा शब्दांत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर शंका व्यक्त केली.
'या' सहा जणांना सहआरोपी करा - अंधारेंची मागणी
सुषमा अंधारे यांनी मृत डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी थेट सहा जणांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. या सहा व्यक्तींची नावे त्यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केली आहेत:
डॉ. अंशुमन धुमाळ
डीवायएसपी राहुल दस (DySP)
एपीआय जायपात्रे (API)
दोन पीए (शिंदे, नागटिळक)
सुनील महाडिक
'न्यायाच्या भूमिकेत राहा, आमची मदत करा'
आंदोलन करतानाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलेलो नाही. आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलेलो नाही, असे सांगत, त्यांनी पोलीस प्रशासनाला आवाहन केले, तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा. तुम्ही उलट आमची मदत करा, असं आमचं म्हणणं आहे.
या प्रकरणात पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आणि निष्पक्ष तपास करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांसह सुषमा अंधारे यांनी लावून धरली आहे.