उदयनराजे भोसले यांच्यावर घसरले असून उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय? असा सवाल करीत भाजपसह उदयनराजेंवरही त्यांनी निशाणा साधला आहे.
सातारा : भाजपचे राज्यसभेतील सहयोगी अपक्ष खासदार उद्योगपती संजय काकडे हे माजी खासदार व नुकतेच भाजपात स्वगृही परतलेले उदयनराजे भोसले यांच्यावर घसरले असून उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय? असा सवाल करीत भाजपसह उदयनराजेंवरही त्यांनी निशाणा साधला आहे. संजय काकडेंच्या या वक्तव्यामुळे सातार्यातील उदयनराजेप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून संजय काकडे यांना दिसेल तिथे ठोकून काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या एप्रिल महिन्यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाल संपणार आहे. महाराष्ट्रातून भाजपतर्फे राज्यसभेत असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अमर साबळे अपक्ष सहयोगी खासदार संजय काकडे हे निवृत्त होणार असून संजय काकडे अथवा अमर साबळे यांच्या होणार्या रिक्त जागेवर माजी खासदार उदयनराजे यांची वर्णी लावण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे. मात्र, भाजप हायकमांडने यासंदर्भात अजून कोणत्याही प्रकारची हालचाल केली नसतानाही संजय काकडे यांनी पुण्यात काल माजी खासदार उदयनराजेंवर निशाणा साधत उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे? राष्ट्रवादीतून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सातार्यात लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटलांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीकडून त्यांचा पराभव झाला. श्रीनिवास पाटील तर गेली दहा वर्षे सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते. तरीही त्यांनी उदयनराजेंचा पराभव केला, हे पक्षाने लक्षात घ्यायला हवे. केवळ छवी असून उपयोग होत नाही, तर त्याला जनाधारही असायला हवा. उदयनराजेंच्या पाठिमागे किती जनाधार आहे, याचाही पक्षाने विचार करायला हवा, असा टोलाही काल काकडे यांनी लगावला आहे. संजय काकडे यांनी उदयनराजेंच्या बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सातार्यात उदयनराजेप्रेमींमध्ये प्रक्षुब्धता निर्माण झाली असून सोशल मीडियावर अनेक कार्यकर्त्यांनी खा. संजय काकडे जिथे दिसतील तिथे ठोकून काढण्याचा इशारा दिलेला आहे.