सातारा जिल्हयात काँग्रेसची राजकीय ताकत वाढवून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणे ही माझी जवाबदारी आहे. त्यासाठी तळागाळातून कामाला सुरवात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा कॉंग्रेसचे नूतन प्रभारी डॉ सुरेश जाधव यांनी केले
सातारा : सातारा जिल्हयात काँग्रेसची राजकीय ताकत वाढवून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणे ही माझी जवाबदारी आहे. त्यासाठी तळागाळातून कामाला सुरवात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा कॉंग्रेसचे नूतन प्रभारी डॉ सुरेश जाधव यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत शुक्रवारी डॉ जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, माझी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी निवड केल्यानंतर मी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेलो आहे. इथल्या दैनंदिन कामाची माहिती व्हावी, लोकांशी भेटीगाठी करता याव्यात यासाठी हा माझा दौरा आहे. मी प्रथमतः इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी काळात पक्षाची पुढील दिशा ठरवणार आहे. जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी असो वा तालुका स्तरावरील कार्यकारिणी याचीही मी लवकरात लवकर माहिती घेऊन रिक्त जागा कशा भरल्या जातील याकडे लक्ष देणार आहे.
गेले १० महिने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद रिक्त होते. पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमच्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हाचं अध्यक्षपद मला दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. त्यांनी दिलेल्या संधीचं मी चीज केल्याशिवाय राहणार नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी पक्षासाठी अविरत कष्ट करीन आणि पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देईन. जिल्हा काँग्रेसला मोठी परंपरा आहे ती पुढे नेण्याचा मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही जाधव यांनी दिली.
राज्यात आम्ही आत्ता जरी महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असलो तरी, आम्ही काँग्रेसची ताकद स्वतःच्या बळावर जिल्ह्यात वाढवणार आहोत. त्यासाठी आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा बँकांच्या निवडणुका ताकदीने लढवून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार आहोत. यासाठी काँग्रेस पक्षामध्ये समाजातील जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करून घेणार आहोत. यामध्ये युवकांचा आणि युवतींचा जास्तीत जास्त सहभाग असेल यासाठी आम्ही आग्रही आहोत. सर्व कार्यकर्त्यांना उत्साह वाटेल, त्यांना लढण्याची उमेद मिळेल असे वातावरण आगामी काळात पक्षात निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन, असे जाधव म्हणाले.
यावेळी प्रदेश पदाधिकारी सौ. रजनीताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजीकाका घाडगे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब शिरसाट, सातारा तालुका अध्यक्ष आनंदा जाधव, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष आनंद जाधव, अन्वरपाशा खान, सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई महाडिक, उपाध्यक्षा सौ. सुषमाताई राजेघोरपडे, सातारा शहर अध्यक्षा सौ. रझिया शेख, सातारा तालुका अध्यक्ष सौ. माधुरी जाधव, सोशल मिडीया विभागाचे आमित जाधव, विशाल पवार, कर्मचारी संतोष डांगे, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.