फलटण : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मंगळवारपासून (ता. ७) बेपत्ता असलेल्या मेखळी (ता. बारामती) येथील सख्ख्या बहीण-भावाचा हृदयद्रावक अंत झाला आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुतेजवळील धर्मपुरी ते गुरसाळे दरम्यान नीरा उजवा कालव्यामध्ये आज सकाळी या दोघांचे मृतदेह आढळून आले. किरण काकासाहेब चोपडे (वय २६) आणि काजल काकासाहेब चोपडे (वय २३) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे बारामती आणि फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजल चोपडे ही फलटण येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी आपल्या प्रोजेक्टच्या कामासंदर्भात आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कामासाठी ती आपला भाऊ किरण याच्यासोबत दुचाकीवरून फलटणला आली होती. दुपारी ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास त्यांनी कॉलेजमधील काम पूर्ण केले, मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.
रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न आल्याने काळजीत पडलेल्या आई-वडिलांनी आणि नातेवाइकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिस आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत असतानाच, आज सकाळी १० ते ११ च्या सुमारास माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी-गुरसाळे हद्दीत नीरा उजवा कालव्यामध्ये दोन मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसले. घटनेची माहिती मिळताच नातेपुते ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर, ते बेपत्ता असलेले किरण आणि काजल असल्याचे निष्पन्न झाले.
नातेपुते पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले आणि त्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी नातेपुते ग्रामीण पोलीस ठाण्यात 'आकस्मिक मृत्यू' म्हणून नोंद करण्यात आली आहे.
शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचा आधार बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन तरुण मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने चोपडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली? दुचाकी कालव्यात गेली की अन्य काही कारण आहे? याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जावेद जमादार करत आहेत.