फलटण: मराठी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, 'दैनिक पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव साहेब आणि पुढारी समूहाचे संपादक श्री. योगेश जाधव यांची मुंबईत सदिच्छा भेट घेण्यात आली. याप्रसंगी 'सातारा टुडे'चे संपादक संग्राम निकाळजे यांनी लिहिलेल्या 'लोकल टू ग्लोबल' या पुस्तकाचे कौतुक करत जाधव साहेबांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
मुंबई येथे झालेल्या या भेटीदरम्यान, 'सातारा टुडे'च्या माध्यमातून जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तरुण संपादक संग्राम निकाळजे यांनी आपले 'लोकल टू ग्लोबल' हे पुस्तक प्रतापसिंह जाधव साहेबांना भेट दिले. जिल्ह्याच्या पत्रकारितेत सक्रिय असतानाच जागतिक विषयांना गवसणी घालणारे पुस्तक लिहिल्याबद्दल जाधव साहेबांनी निकाळजे यांचे विशेष अभिनंदन केले.
संग्राम निकाळजे यांच्या लेखणीचा गौरव करताना प्रतापसिंह जाधव साहेब म्हणाले, "असेच निरंतर लिहित राहा आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैभव वृद्धिंगत करा." पुढारी समूहाचे संपादक योगेश जाधव यांनीही निकाळजे यांच्या या साहित्यिक प्रयत्नांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संग्राम निकाळजे यांनी आपल्या पुस्तकातून स्थानिक प्रश्नांना जागतिक स्तरावरील विचारांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. एका संपादकाच्या नजरेतून उतरलेले हे पुस्तक वाचकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. राज्याच्या पत्रकारितेतील भीष्मपितामह मानल्या जाणाऱ्या जाधव साहेबांकडून मिळालेली ही दाद म्हणजे निकाळजे यांच्या लेखणीचा मोठा सन्मान मानला जात आहे.
या भेटीमुळे सातारा आणि फलटण परिसरातील पत्रकारिता व साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, संग्राम निकाळजे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.