फलटण: माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय नानासो मारुती लंगूटे यांचे सुपुत्र आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावाने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केलेले राहुल नानासो लंगूटे यांचे आज, वार बुधवार, दिनांक ३ डिसेंबर रोजी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यावर आणि त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
राहुल लंगूटे यांना त्यांच्या सर्व मित्रपरिवारात 'राजा माणूस' म्हणून ओळखले जात असे. त्यांचे राहणे अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ आणि हसरे होते. मदतीच्या बाबतीत त्यांचा हात नेहमीच पुढे असायचा. दोस्तीतील प्रत्येक नातं त्यांनी जीवापाड जपलं आणि याच कारणामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. त्यांच्या या अकाली जाण्याने 'दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस' हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
स्वर्गीय नानासो मारुती लंगूटे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा राहुल यांच्यात होता. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांना हा विश्वास बसत नाहीये की, त्यांचा अत्यंत आवडता मित्र, आप्त आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेला.
राहुल लंगूटे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि लंगूटे कुटुंबियांना या अतीव दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, यासाठी प्रार्थना!