फलटण, सातारा: फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आणि राजकीय भूमिकेवरही स्पष्टीकरण दिले.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्याच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, "जिल्ह्याची संस्कृती नष्ट केली आहे, ती संस्कृती आपल्याला परत आणायची आहे." यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व आपल्याला नक्कीच पाठबळ देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
फलटण आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मुलांसारखे जपले आहे, असे सांगून रामराजे म्हणाले की, "माझ्या कुटुंबातील लोकांनी तुमच्यासोबत जायचंच असा निर्णय घेतला आहे. माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत." त्यांनी आपल्या तत्कालीन नेत्यांनी भरभरून जे दिले, त्याचा फायदा जिल्ह्याला झाल्याचे नमूद केले. तसेच, कुटुंबाची काळजी घेणे, मुलांना सुरक्षित ठेवणे आणि पोलीस चौकीच्या राजकारणाबद्दल जी ताकद लागेल, ती देणे यापलीकडे आम्हाला काही मागायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी जुना अनुभव सांगितला. "एकनाथ शिंदे पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा मी सभापती होतो. मुंबईला निघालो असताना घाटात काहीतरी ढासळले होते. तिथे पाहिलं तर स्वत: मंत्री कामाच्या ठिकाणी उभा होता. असा मंत्री माझ्या आयुष्यात पाहिला नाही. काम चालू असताना स्वतः मंत्री तिथे काम करून घेतो, असं समर्पण त्यांचं आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. इतक्या गडबडीतही शांत राहण्याचे तंत्र शिंदेंकडून शिकण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
आपण कोणत्या पक्षात आहोत, या प्रश्नावर मुंबईत चर्चा होणार असल्याचे सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सध्याची आपली भूमिका स्पष्ट केली. "मी कुठल्या पार्टीत आहे, यावर मुंबईवर चर्चा होणार फक्त मी एकच सांगेन, मी महायुतीत आहे. बाकीचं काय बोलून मला वेळ घालवायचा नाही," असे ते म्हणाले.
जिल्ह्यात काय करायचे ते करू, असे सांगत त्यांनी कोणत्याही पक्षात आपले शत्रू नसल्याचे स्पष्ट केले, परंतु जिल्ह्यात आपल्याला न पटणारी लोक आहेत, असे मत व्यक्त केले.
यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाच्या यशाचे श्रेय बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांना दिले, परंतु त्याबद्दल नंतर सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले.
सभेत उपस्थित असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना (लेकरांना) संरक्षण देऊन त्यांचा आशीर्वाद मिळवावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली आणि आपल्या लोकांना आपलेसे करण्यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी केली.