सातारा : गेले दीड वर्ष करोना महामारीच्या त्रासामुळे आजही राज्यातील मंदिरे सामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले असल्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात असेच धामधुमीत साजरी होणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि उद्याचा दहीहंडी अर्थात गोपाळकाला हा बंद मंदिरातच केवळ धार्मिक पूजा करून साजरा करण्यात आला . सातारा शहरातील विविध श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्म सोहळा आज श्रावण वद्य अष्टमीला मोठ्या भक्तिभावाने मात्र सोशल डिस्टंसिंग चे नियमांचे घालून दिलेले आदेशांचे पालन करतच अगदी मोजक्या आणि केवळ मंदिराशी संलग्न असलेल्या लोकांनीच साजरा केला. सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीनिमित्त दरवर्षी तीन दिवसाचा मोठा उत्सव साजरा होतो .मात्र मागील दोन वर्षे करोनामुळे या उत्सवावर तसेच उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी मंदिरामध्ये जन्माष्टमी निमित्त होणारे श्री रामकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने होणारे सांप्रदायिक शाम नामसंकीर्तन ,रामकृष्ण पाठशाळेच्या भगिनींनी सादर केलेले 18 अध्याय गीता चे पठण तसेच विष्णुसहस्त्रनाम हे यावर्षीही साजरे झाले नाही .मात्र जन्माष्टमीनिमित्त आज सोमवारी सकाळी मंदिरांमध्ये वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीत दिवशीकर यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीला पवमान पंचअमृत अभिषेक तसेच विशेष पूजा संपन्न झाली .रात्री बारा वाजता जन्मकाळा निमित्त श्री विष्णुसहस्त्रनामचे पठण तसेच सहस्त्रतुलसी दल अर्पण कार्यक्रम संपन्न झाला .. सचिन दिवशी कर यांचे हस्ते ही पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त श्रीकांत दिवशीकर ,सुरेश दिवशीकर, संदीप दिवशीकर तसेच दिवशीकर परिवारातील सदस्य उपस्थित होते. दरवर्षी जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी होणारा दहीहंडी कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला असून जन्माष्टमीनिमित्त या मंदिराला आकर्षक फुले. खेळांचे घड तसेच विविधरंगी रांगोळ्या. विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजविण्यात आले आहे .मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांनी मंदिरा बाहेरूनच दर्शन घेतले तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रात्री जन्म काळाचा सोहळा संपन्न करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन प्रसादाचे वितरण करण्यात आले. दरम्यान सातारा शहर परिसरातील खंणआळी येथील श्रीकृष्ण मंदिर, संगमनगर परिसरातील श्री नटराज मंदिरातील श्री राधा कृष्ण मंदिर, फलटण तालुक्यातील गिरवी येथील सुप्रसिद्ध देशपांडे यांच्या श्रीकृष्ण मंदिरात तसेच माण तालुक्यातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी स्थळावर असलेल्या भगवान गोपाल कृष्ण मंदिरात ही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सातारा शहरातील करंजे भागातील श्री महानुभाव मठातील श्रीकृष्ण मंदीरातही जन्माष्टमी निमित्त विशेष पूजा आणि सजावट करण्यात आली होती.