व्यसनमुक्त युवती संघ महाराष्ट्राचा उपक्रम; ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
फलटण (प्रतिनिधी):
व्यसनमुक्त युवती संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला भगिनींसाठी विशेष ३ दिवसीय निवासी महिला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. २८ ते ३० एप्रिल या कालावधीत राष्ट्रबंधू राजीव दीक्षित गुरुकुल, पिंप्रद (ता. फलटण) येथे संपन्न होणार आहे. या शिबिरात राज्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.
शिबिराचे उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती
मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सातारा जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती सौ. ऋतुजा शिंदे व समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल.
भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
तीन दिवसांच्या या शिबिरात विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे:
२८ एप्रिल: श्री. प्रमोद भापकर (महाराणी ताराबाई), प्रा. रविंद्र कोकरे (स्त्री जन्मा तुझी कहाणी), ह.भ.प. बंडातात्या कराडकर (पुरुषांचा खंबीर आधार) यांची व्याख्याने होतील. रात्री ह.भ.प. सुमित शिंदे यांचे कीर्तन आणि जादूगार शिवम यांचे जादूचे प्रयोग होतील.
२९ एप्रिल: दत्तात्रय धोत्रे (स्त्री आरोग्य), सौ. पल्लवी गुणवरे (मी जिजाऊ बोलतेय - एकपात्री प्रयोग), प्रमोद भापकर (महाराणी सईबाई) आणि ॲड. नंदिनी पंडितराव माने-देशमुख (बंधनाच्या उंबरठ्यावर) यांचे मार्गदर्शन लाभेल. रात्री ह.भ.प. श्रावणी देशमाने यांचे कीर्तन व 'होम मिनिस्टर' हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.
३० एप्रिल: सौ. मिराताई रणवरे (आकाशी झेप घे रे पाखरा) यांचे व्याख्यान होईल.
राणी लक्ष्मीबाई राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
शिबिराच्या शेवटच्या दिवशी (३० एप्रिल) मुंबई येथील व्यसन विरोधी कार्यकर्त्या श्रीमती वर्षा विद्या विलास यांना सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती प्रिया महेश शिंदे यांच्या हस्ते 'राणी लक्ष्मीबाई राज्यस्तरीय पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भोजन व निवास व्यवस्था मोफत
व्यसनमुक्त युवती संघाच्या अध्यक्षा सौ. अरुंधती जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, या शिबिरासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. सहभागी महिलांची राहण्याची आणि भोजनाची सोय मोफत करण्यात आली आहे. आपले कुटुंब आणि मुले व्यसनांपासून कशी दूर ठेवावीत, याचे मोलाचे मार्गदर्शन येथे मिळणार आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मनीषा तावरे, पद्मजा जगदाळे आणि व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष दीपक जाधव व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.