फलटण: खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र बेकरीसमोर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोन अल्पवयीन संशयितांना जेरबंद करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांच्या डी.बी. पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ७ जुलै २०२६ रोजी खंडाळा येथे एका तमाशाच्या ठिकाणी किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित आशुतोष उर्फ बटया संतोष जाधव (रा. साखरवाडी) व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी फिर्यादीवर पिस्तूलमधून चार राऊंड फायर केले होते. या हल्ल्यात फिर्यादीला दोन गोळ्या लागल्या होत्या, तर एका गोळीने त्याचा सोबती जखमी झाला होता. एक गोळी मिसफायर झाली होती. या घटनेनंतर मुख्य आरोपीला जागीच पकडण्यात आले होते, मात्र त्याचे दोन अल्पवयीन साथीदार फरार झाले होते.
पोलिसांची सापळा रचून कारवाई:
हे फरार संशयित एका गुप्त ठिकाणी लपून बसल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली. त्यानंतर स.पो.नि. सुबनवळ आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप-निरीक्षक दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून या दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान असेही समोर आले की, या आरोपींनी साखरवाडी परिसरात पैशाच्या कारणावरून एका व्यक्तीला पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केली होती.
ही धडाकेबाज कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.