फलटण (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित 'सामाजिक समता सप्ताह' अंतर्गत, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व सांस्कृतिक विभागाच्या वतीने 'सामाजिक समता' या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान, संविधान प्रास्ताविक वाचन आणि निबंध स्पर्धा पार पडल्या.
डॉ. आंबेडकरांचे शेती व शिक्षणातील योगदान मोलाचे: प्राचार्य डॉ. निंबाळकर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा दिला. फलटण संस्थानने त्यांच्या शिक्षणासाठी केलेले सहकार्य, आंबेडकरांनी शेतकरी समुदायासाठी दिलेले योगदान आणि कोकणातील खोत पद्धतीविरुद्ध दिलेला लढा यावर त्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी सामाजिक मूल्यांची जाणीव ठेवून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
समता ही केवळ संकल्पना नसून आचरणाची गरज: सौ. वैशाली कांबळे
मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या व उपशिक्षिका सौ. वैशाली कांबळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा सखोल उहापोह केला. त्या म्हणाल्या, "समाजातील जात, धर्म आणि लिंगभेद दूर करण्यासाठी शिक्षण व जागरूकता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगती न करता सामाजिक जबाबदारी ओळखावी आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत."
समताधिष्ठित समाज निर्माण करणे हेच उद्दिष्ट: प्राचार्य डॉ. चव्हाण
अध्यक्षीय भाषणात कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी सामाजिक समतेचे महत्त्व विषद केले. "विद्यार्थ्यांनी महामानवांच्या विचारांचे अनुसरण करून परदेशातील उच्च शिक्षणासाठी असलेल्या शिष्यवृत्तींचा लाभ घ्यावा आणि समताधिष्ठित समाज घडवण्यासाठी योगदान द्यावे," असे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन व उपस्थिती:
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. तरटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृषाली गायकवाड व कुमारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले, तर आभार प्रा. एस. पी. तरटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या शब्द संकलनाचे काम कृषि विस्तार विभागाचे डॉ. जी. बी. अडसूळ यांनी पाहिले